लोक बहता येत न
*लोक बघताहेत नं !*
परदेशात गेले होते तेव्हा जरा वेस्टर्न कपड्यात अधे-मधे फोटो काढून घेतले. इथे आल्यावर जवळच्या मैत्रिणीने फोटो बघून म्हटलं, 'अगं किती छान, इथे का नाही घालत तू हे सगळं, छान दिसतंय तुला'...तेव्हा तोंडातून सवयीचं वाक्य ओघळून गेलं, "छे गं, इथे कुठे घालू हे असं...लोक बघतात ना"...
मग त्या दिवशी स्वतःच स्वतःला हा प्रश्न विचारला...लोक बघतात ना म्हणजे काय ?, लोक बघणारच, बघून बोलणारच. पण म्हणून त्यांच्या बघण्यावर आपण आपलं आयुष्य आखायचं का ?
जरा विचार करून बघा, आयुष्यात किती कमी गोष्टी आपण लोक बघतील, मग काय म्हणतील हा विचार न करता करतो. मला खूप कौतुक वाटतं अशा माणसांचं जी अशी ओझी न घेता जगतात.
माझी एक मैत्रीण आहे. देशा-परदेशात कुठेही जेवायला गेली की, मांडी ठोकून बसते आणि जेवते...हो, खुर्चीवरही मांडी घालून बसते. काटे-चमचे न घेता निवांत हाताने जेवते, फिंगर बाऊलमधल्या पाण्यात हात घालून तो हात आधी तोंडावर फिरवून ओठबिठ साफ करून घेते, दात कोरणं असेल तर व्यवस्थित दातही कोरून घेते...ती हे सगळं करत असते तेव्हा ती सोडून बाकीचे सगळे अवघडून जातात. पण ही बाई मजेत असते. मला तिचं ते मज्जेत असणं कुठेतरी सुखावून जातं आणि कुठेतरी सूक्ष्मसा हेवा पण वाटतो.
मध्ये माझ्याकडे आवाजाच्या ट्रीटमेंटसाठी एक मुलगी यायची, तिच्याबरोबर नेहमी तिची एक मैत्रीण असायची. दुसऱ्या की तिसऱ्या सेशनला त्यांनी स्वतःहूनच सांगितलं की त्या प्रेम करतात एकमेकींवर. ते प्रेम त्यांच्या नजरेतून, त्यांच्या हालचालीतूनही कळायचं मला. त्यात कुठेही अवघडलेपणा किंवा चोरटेपणा मला कधीच जाणवला नाही. लोक बघताहेत याची जराही फिकीर नसणारं ते स्वच्छ प्रेम होतं...एवढं पारदर्शक होऊन जगायलाही धाडसं लागतं ना...
असाच एक ग्रुपमधला मित्र आहे...निव्वळ निखळ आनंदाचा झरा. वर्षातले अकरा महिने परदेशात, आणि मग जेव्हा केव्हा धूमकेतूसारखा उगवतो तेव्हा सगळ्या मित्र-मैत्रिणींना सरळ मिठी मारून कडकडून भेटतो...त्या मिठीतला त्याचा स्पर्श जितका नितळ असतो तेवढीच त्याची नजर स्वच्छ असते. मी परत विचारात पडते, हे का जमत नाही आपल्याला. हे अवघडलेलं संकुचित मन मोकळं कधी होणार..."लोक बघताहेत ना" , हे कधी थांबणार?
लोक बघतात !!!
अपरात्री भयाण रस्त्यावर एक बलात्कारीत निर्वस्त्र निर्भया तडफडत पडली होती, तेव्हाही लोक बघतच होते...
ट्रेनच्या भयंकर गर्दीत एक जीव तेव्हा हात सुटून खाली पडला तेव्हा त्याला हात देण्याऐवजी ते दृष्य मोबाईलमध्ये टिपणारी 'लोकं बघतच होती की '!
आयुष्याच्या या टप्प्यावर आता असं नक्कीच सांगू शकते की, 'लोक बघताहेत ना', याला घाबरू नये , घाबरावं ते केवळ आपल्या अंतरात्म्याला. कारण खरंतर फक्त तोच बघत असतो आपल्याला आणि त्याच्याशी प्रामाणिक राहणं खूप गरजेचं आहे. ज्याने निखळ, सात्विक आनंद मिळेल ते न घाबरता केलं पाहिजे. आयुष्य छोटं आहे आणि येणारा प्रत्येक क्षण काही देऊन जाणार आहे. त्या क्षणाचं सोनं करता येईल..जर लोक बघताहेत ना, या चक्रातून स्वतःची सुटका केली तर...
बघा ना, जर चिखलाने आणि घाणीने बरबटलेल्या कुष्ठरोग्याला भर पावसात उचलून घेताना कर्मयोगी बाबा आमटे यांनी 'लोक बघताहेत ना' असा विचार केला असता तर आज 'आनंदवन' अस्तित्वातच नसतं...
तर सांगायचा मुद्दा हा... की मी आता अधून-मधून वेस्टर्न कपडेही घालते, खरंच छान दिसतात... चिंब पावसात छत्री बंद करुन भर रस्त्यात भिजते... लोक बघत असतात, बघूदेत...खरंच भिजताना खूप छान वाटतं... बघा तुम्हीसुद्धा असं जगून!
*- सोनाली लोहार*
Comments
Post a Comment