Kavita

तुझे मन आवर,
ते जास्त विवस्त्र आहे..!!

तिच्या गोऱ्या उघड्या मांड्यानी,
समाज बिथरलाय म्हणे...
पण
अगदी अलिकडेच ऐकलं होत..

चार महिन्याच्या बालिकेच्या मांडयानी
घात केला अशाच कुणा मर्दाचा
जो अजूनही शोधतोय नवे कारण
त्याच्या देहाच्या आसक्तीसाठी....

सात वर्षाची चिमुरडी काका म्हणते
ज्याला...
त्याचाही देह मजबूर होतो तिचे
निरागसत्व बघून....

तेरा वर्षाची शाळकरी पोरी
युनिफाॅर्म का घालते उगाच
तिलाही पाहून  तेच वाटतय
सभ्य (?) पुरुषांना..

माझ्या घरी समीना येते कामाला
बुरखा घालून...
नखशिकांत
नालायक बाई...
शरीर झाकून चेतवते
निष्पाप पुरूषी देहांना..
नाही का?

साडी नेसून, कुंकू लावून ऑफिसात
जाणारी मीना पण तशीच....
साली...
साडीतून उतू जाते
अन निष्पाप पुरूषांची माती होते.

सलवार कुरता, साडी किंवा असो
मिनी स्कर्ट...
बाईच असते चवचाल...
छपरी,
छचोर..
छम्मकछल्लो
किंवा,
आयटम......

अश्लील बोलणारा पुरूष मात्र ठरतो मर्द...
मित्रांमध्ये.

पडद्याआडची राणी पद्मिनी
पाहून जो बेइमान झाला तो
अल्लाउद्दिन फिरतो हल्ली
प्रत्येक गाडीवर, सिग्नलला
शेजारी, शाळेत अन...
जोहार होतो पद्मिनीचा
सगळीकडेच..

पण माझ्या संवेदनशील मित्रा....
तुझ्या शरीराच्या संवेदना ह्या मेंदूच्या
कह्यात हव्यात...
ज्या सांगतील
योग्य जागा योग्य भावनांसाठी

असा मर्द शिकलोय आपण
आपल्या इतिहासाच्या पुस्तकात
ज्याने कब्जात आलेली, हतबल
सुभेदाराची सून..
आई म्हणून नावाजली
पालखीत बसवून साडीचोळी करवली

त्यालाही होते मर्दाचे शरीर..
अल्लादिन खिलजीसारखेच..
किंबहुना
त्याहूनही देखणे
पण मेंदू राजा होता त्या शरीराचा
आणि मनाचा
म्हणूनच इतिहासाने घेतली दखल
त्याच्या अपरिमित पुरूषत्वाची.

तिने स्वातंत्र्याचा अर्थ लावला असेल तोकडा तीच्या कपड्यांइतका,
...
पण तुझी नजर कुठे आहे लक्ष्मणासारखी....
ज्याने घरातील जानकीची पावलेच पाहीली.

म्हणूनच जाता-जाता इतकच सांगेन, मित्रा by
तिच्या कपड्यांपेक्षा तुझे मन आवर
ते जास्त विवस्त्र आहे..
मेंदूच्या बंधनाशिवाय.....!

Comments