Virtual न्यूनगंड
"Virtual न्यूनगंड "
शाळेचे क्ष वर्षांनी गेट टुगेदर होते . सगळेच जमलेले . अनेक जणी आपण किती मॉडर्न अशा आवेशात तयार होऊन आलेल्या तर अनेक जणी आपले वाढलेले शरीर सांभाळत आपल्या संसारामुळे आलेला पोक्तपणा सावरत होत्या , काही जणी अगदीच नीट नेटके, साधे सुधे म्हणावे अशा तयार होऊन आलेल्या.
वर्गातल्या अति दुर्लक्षित मुली आता खूप सुंदर दिसत होत्या आणि त्या त्यांच्या आयुष्यात खूप काही कर्तृत्व गाजवत होत्या , त्यातून आलेला आत्मविश्वास त्यांच्या वागण्या बोलण्यात सहजपणाने डोकावत होता. वर्गात नेहमी सुंदर गणल्या गेलेल्या , हुशार गणल्या गेलेल्या काही परदेशात राहून आलेल्या त्यांच्या वागण्या बोलण्यात तो आत्मविश्वास अगदी झळकत होता . काही संसारात रमून सर्व सामान्य आयुष्यात आनंदी असलेल्या ( मला माझ्यासारख्या वाटतील ) अशा होत्या.
मुलांची कथा वेगळी नव्हती. अनेक जण मस्त स्मार्ट टी शर्ट आणि जीन्स घालून आलेले , काही जण सुरवार झब्ब्यात तर काही जण अगदीच संसारी शर्ट पॅण्ट मध्ये आलेले . काही आपापल्या क्षेत्रात अगदी उंची गाठून प्रसिद्ध झालेले काही सामान्य नोकरीच्या चक्रात अडकलेले तर काही परदेशात वास्तव्य करत असलेले आणि खास या कार्यक्रमासाठी आलेले .
मी मात्र अंग चोरून आत शिरले तीच लोकांमध्ये झालेले बदल पाहत . हातात आणलेला शंभर एक डब्यांचा लाडू पिशवीत लपवत . वर्गातील हुशार मुलींपैकी पण सामान्य दिसणारी मी . मी माझ्या हुशारी मुळे भरपूर शिकेन काहीतरी करेन आणि व्यवहारी जगात जागा मिळावेंन असे वाटणारे अनेक होते .
मी परदेशात गेले नाही , कि कुठे नोकरी करून कर्तृत्व गाजवले नाही . माझी लिखाणाची आवड काही वर्षांपूर्वी घरात प्रवेश केलेल्या सून बाईंनी ब्लॉग करून दिल्यामुळे थोडीफार लोकांना परिचित झालेली. बाकी बागकाम , दुपारी घरीच चालवत असलेली बालवाडी, शिकवण्या आणि संध्याकाळी घरी आलेली माझी चिमणी बाळे आणि नवऱ्यासाठी राखलेला वेळ . हेच माझे आयुष्य !!
खरे सांगायचे तर एवढे दिवस मला हे सगळे समाधान कारक वाटत होते कारण फेसबुक , व्हाट्स ऍप येईपर्यंत हेच माझे विश्व् होते . पण गेले काही दिवस इतर लोकांचे फोटो पाहून वाटलं कि अरे आपण जगलोच नाही भरभरून. हळू हळू समाधान न्यूनगंडात बदलले. पण माझी तरुण मैत्रीण त्या न्यूनगंडावर मात करायला शिकवत होती . माझी सून !
सुनबाई हौशी !! रोज बसतो आम्ही दोघी सगळे आवरल्यावर झोपाळ्यावर गप्पा मारत . आणि ती शिकवते मला हे सगळे फेसबुक , ब्लॉग , मराठी लिखाण आणि लॅपटॉप वापर. तिनी दिलेल्या आय फोन वर आणि लॅपटॉप वर माझे प्रयोग चालतात. आय फोन वापरायला मी कशी अयोग्य आहे याची बाजूला चालू असलेली चेष्टा ऐकतच माझे शिक्षण चालू असते . तिनेच फेसबुक वर मला बालपणीच्या मैत्रिणी शोधून दिल्या.
शाळेच्या गेट टुगेदर बद्दल ऐकल्यावर सुनबाई च फार उत्साहात होती . तिनी मस्त ड्रेस आणला .. मी हौसेने लाडू करायला बसली असताना तिनी येऊन वळले आणि म्हणाली “आई सगळे खुश होतील”. बोलता बोलता पटकन एक लाडू तोंडात पण टाकला पोरीन. रजा काढून अगदी मला माझ्या गावी ती तिच्या गाडीतून घेऊन आलेली
गाव बदललेले !! काही जुन्या खुणा होत्या. शाळेची इमारत आता सुंदर झालेली पण आठवतील अशा काही खुणा शाळेतही होत्या . तिला त्या दाखवल्या. गावातल्याच माई मावशीकडे उतरलो . आणि आज सकाळी सुनबाई मला शाळेत सोडून जवळ कुठे फोटो काढायला जाते सांगून गेली. ती गेली आणि मी अगदीच एकाकी वगैरे झाले.
शाळेच्या प्रांगणात त्या गर्दीत येईपर्यंत माझ्या आतमध्ये असलेला उत्साह थोडाफार उरला होता . सुनबाई ची गाडी गेली भुर्रकन पुढे. मी माझ्यातलं न्यूनगंड लपवत लपवत आत शिरले . मला वर्गमैतरणी कांगावा खोर बायका वाटत होत्या , तर मुले आपल्या प्रगतीचे प्रदर्शन करणारे पुरुष वाटायला लागलेले . कारण माझा न्यूनगंड इकडे येऊन अजूनच वाढल्यासारखा झाला होता . सोबत माझी तरुण सखी सुद्धा नव्हती जीनी "आई" असे म्हणत मला काहीतरी समजावले असते.
कार्यक्रम सुरु झाला तसे मात्र सगळे बदलले . अजूनही सगळे मनानी त्याच आमच्या दहावी अ वर्गातले असल्यासारखे वाटले . आम्ही गप्पा मारल्या . आमच्यातल्या अचानक जग सोडून गेलेल्यांना श्रद्धांजली वगैरे वाहिली . अशाश्वत आयुष्यात आपण कशाचे मोठेपणा आणि कमीपणा मिरवतो असा प्रश्न आला त्या वेळी माझ्या लेखक मनात !! वयाची नव्वदी गाठलेले आमचे गणिताचे सर आले आणि सगळे हळवे झाले . मनात वाटले अरे हि भौतिक प्रगती वगैरे प्रत्येकाची वेगळीच असणार पण आमच्यातले बालपण तेच आहे . त्या हळव्या वेळी कोणीतरी काहीतरी विनोद केला , खरच सांगते तो ऐकू नाही आला पण खदखदून हसले. खूप दिवसांनी अशी मनमोकळी उगाच हसले मी असे वाटले . एकमेकीला टाळ्या देत आम्ही आमचे लहानपण जगलो आणि भौतिक आयुष्यातले मोठेपण सगळे अगदीच विसरलेले . मग सगळे पंगतीत जेवायला बसलो. शाळेच्या स्नेहसंमेलनाच्या जेवणाची आठवण यावी असा मेनू आणि पंगत होती . मन क्ष वर्षे मागे गेले.
जेवणे झाली आणि चित्रच बदलले अचानक लोक मला येऊन जोशीबाई जेवण एकदम झकास वगैरे म्हणायला लागले. आमच्या वर्गातला शहाणे ज्याने ह्या कार्यक्रमाचे आयोजन केले तो आता आभार प्रदर्शन करायला उभा राहिला .
' तसे एवढ्या वर्षांनी तुमची यादी शोधणे , तुम्हाला सगळ्यांना पत्रे , मेल पाठवणे, फोनाफोनी हे म्हणजे लष्कराची भाकरी भाजण्या जोगे होते . पण सुमेधा काळे बाई अर्थात सध्याच्या अंजली जोशी बाईंच्या सुनबाई माझ्या मदतीला धावल्या आणि हे सगळे आयोजन , नियोजन आणि या कार्यक्रमाचे प्रयोजन काय असावे ह्याचा अभ्यास हे सगळे तिनेच केले. सुमेधा तू तिला हे सगळे करण्याची परवानगी आणि वेळ दिलास हे उत्तम !!
तर लोकहो गेल्या २ महिन्यात एका नव्याने वर येत असलेल्या सॉफ्टवेअर कंपनीची मालकीण असलेली हि मुलगी ६ वेळा इथे येऊन गेली . सरांचा पत्ता शोधला त्यांच्याकडे मला घेऊन गेली . एवढ्या वर्षात गावातल्या गावात मी त्यांच्याकडे एकदाही गेलो नव्हतो लोकहो !! सरांच्या घरी जाऊन आज त्यांना गाडीतून तीच घेऊन आली . सुमे तुझा नवरा आणि मुलगा पण आलेले या तयारीचा शेवटचा हात फिरताना . तर आधी या जोशी परिवाराचे मनापासून आभार. बरे मी म्हणालो जेवणाचा खर्च आम्ही विभागून करू . तर जोशीबुवा म्हणाले अहो माझ्या बायकोच्या आनंदापुढे काय खर्चाचे घेऊन बसलात . सुमे कुटुंब छान बांधून ठेवले आहेस हो . मुद्दा भरकटायला नको तर या कार्यक्रमासाठी आलेल्या सर्वांचे मनापासून आभार आणि जोशी कुटुंबाचे विशेष आभार !! आता पसायदान होईल आणि मग आपण सगळे आपल्या काँट्रीब्युशन मध्ये मी आयोजित केलेल्या बस मधून आपली आठवी ची सहल गेली त्या गणपती बागेत जाऊ आणि भेळ खाऊन आजच्या दिवसाची संध्याकाळी सांगता करू . काय.. त्या काँट्रीब्युशन च्या पैशाचे करावे काय असा प्रश्न पडलेला , त्यातून सुचलेली हि कल्पना. तर आयोजक मंडळ आणि सर्व उपस्थितांचे मनापासून आभार !! पुढील कार्यक्रमाची सूत्रे मी आयोजक मंडळ सदस्य पांडुरंग खोत यांना देतो . '
मी या धक्क्यातून सावरणे तसे अवघड झालेले . मी कोणत्या न्यूनगंडातून आले आणि इकडे चित्रच वेगळे. आणि लक्षात आले कि अरे लाडू राहिलेच . मी मधेच उभी राहिले आणि म्हणाले
' शहाणे एक मिनीट भर बोलू का ? हा लाडवाचा डब्बा आणलाय पास करून घ्या एक एक लाडू सगळे .' असे म्हणत आपल्याला मिळालेले हे surprise आहे असे जाणवू न देता डबा पास करत मी खाली बसले . खोतांचे भाषण मग बागेतली सहल सगळे मस्त झाले . कधी एकदा मानसी माझी तरुण मैत्रीण मला भेटते आणि मी तिला घट्ट मिठी मारून एवढा वेळ रोखलेले माझे अश्रू मोकळे करते असे झालेले .
बस शाळेच्या गेट पाशी आली . आम्ही एकमकांचे पत्ते लिहून घेतले . खोताने लगेच आमचा व्हाट्स ऍप ग्रुप केला आणि निरोप घेऊन मी बाहेर पडले .
बाहेर सुंदर हसू चेहऱयावर घेऊन माझी सून गाडीपाशी उभी होती . वर्गातले सगळे तिच्याशी बोलत होते . ती पण नम्रपणे सगळ्यांची माहिती विचारात बोलत होती . निगर्वी चेहऱ्यावरचे ते हसू पाहून मलाच मूठभर मांस चढले , गेले काही दिवस आलेला कोण तो न्यूनगंड कि कोण धूम पळालेला आज. सगळे माझ्या सुनेचे , माझ्या संसाराचे कौतुक करत होते .
मला पाहून मानसी म्हणाली " निघूया आई ? " गाडीत बसले आणि मग मात्र माझ्या डोळ्याला धारा लागल्या . " आई सामान आणल आहे, थेट पुण्याला जाऊयात " असे म्हणत पुण्याच्या दिशेला गाडी निघालेली .
" कसे ग वाचलेस मानसी माझे मन !! खरे सांगते ते फेसबुक कि काय आणि त्यातले मैत्रिणींचे फोटो पाहून खूप खूप मागे आहोत असे वाटत होते ग मला !! आज आत अगदी जाव वाटत नव्हते . गेले काही दिवस निराश निराश होते मी . यावे वाटत नसलेल्या ठिकाणी तू सोडून गेलीस मला एकटीला असे वाटले . मी आयुष्याच्या शेवटपर्यंत ऋणी राहीन पोरी तुझी " असेच नि काहीसे मी भरपूर बोलत गेले . खरे सांगते अनेक वाक्य आठवत नाहीत . मानसी गाडी चालवत होती ,मी बोलत होते , रस्ता मागे पडत होता ती फक्त ऐकत होती .. गेले काही दिवस ती मला खूप ऐकत होती आणि त्यातूनच समजले असेल तिला हे सगळे .
चहाच्या टपरीपाशी गाडी थांबवत ती म्हणाली " चहा घेऊया ? " डोळे पुसत मी खाली उतरले आणि एवढा वेळ मला ऐकणारी माझी मैत्रीण म्हणाली .
" आई तुमच्या आत्मविश्वासाच्या प्रेमात होते मी . तुम्ही आहात म्हणून मुले सोडून धाडसाने कम्पनी सुरु केली , बाहेर पडले . जग पहिले . माझ्या आई इतकेच तुम्ही प्रेम करता माझ्यावर आम्हा सगळ्यांवर , आपल्या घरावर. गेले काही दिवस तुम्ही खूप बदलला . तुम्ही तुमच्यावर प्रेमच करायला विसरलात . अगदी दूध तापवताना सुद्धा तुम्हाला confidence वाटत नसे . बालवाडी आणि शिकवणीचे तास सोडले तर खूप अबोल झालात . आपल्या गप्पांमध्ये तुमच्या बोलण्यात इतर मैत्रिणींच्या सुंदर आयुष्याची चित्रे आली . आई तुम्ही खूप सुंदर आहात . तुमचे आयुष्य तुमच्यामुळे सुंदर आहे . त्या आभासी जगातल्या आनंदी चेहऱ्याचं रूप नेहमीच खरे असते असे नाही . माझी सुंदर आई सुंदर राहावी म्हणून हि धडपड. आणि हो जोशीबुवांचे पण आभार माना घरी जाऊन त्यांना पण जाणवलेला तुमच्यातला बदल . त्यांनी सुद्धा खूप समजुतीने घेतले आणि सगळ्यात खूप उत्साहाने भाग घेतला "
मी खरेच भरभरून जगतेय . माझ्या बालवाडीतली मुले , शिकवणीतली मुले बाई बाई करून येतात तो आनंद रोज असतो . बागेतली फुले उमलतात तेव्हा होणार आनंद त्या ट्युलिप च्या बागेत जाऊन फुले पाहण्यापेक्षा किती तरी जास्त असतो हि जाणीव मला खूप सुखावून गेलेली .. पण आज अनेक दिवसांनी. जोशीबुवांना पण बघतेच आता जाऊन घरी . माझ्या आनंदाचे झाड मी अंगणातच लावल आहे आणि मी ते फेसबुकवर शोधत होते .
" आई सेल्फी ? " असे म्हणत मानसीने मला ओढले ओठाचा चंबू करून काढलेला सेल्फी फेसबुकवर टाकत WITH COOL MIL लिहीत पन्नास हॅशटॅग टाकून पोस्ट करून मोकळी !! आणि मी माझ्या मनाला ग्रासलेल्या virtual वेडातून मोकळी झाले . खुप खूप मोकळी .
- - अनन्या मुळ्ये
Comments
Post a Comment